चाललंय आपलं असंच..

चाललंय आपलं असंच..
आयुष्याची जुळवा-जुळव
मांडून नात्यांची समीकरणं
पै-पैशांचा हिशोब करत

वेळ किती माहीत नाही
गृहीत धरलीये तिला
येते-जाते सहज आपली
पहात राहते मला

वाट तुडवते आयुष्य आपले
हृदयात क्षणभर थांबते
मग असेच आठवून काही
मनाशीच चालत राहते

श्वास जिवलग सखा-सोबती
पण 'मोजत' नाही त्याला
परी एकांती बोलत राहतो
उगा एकट्या जीवाला

चाललंय आपलं असंच..
आयुष्याची जुळवा-जुळव
पसारा पडलाय अवती-भोवती
आपलं काहीच नाही मिळत

खूप काही

शून्यशा अनंतातून
सांगावंसं खूप काही
मुक्याशा जीवनातून
बोलवंसं खूप काही

अज्ञेय मितीतून
गुंतावंसं मन काही
जाणवत्या भासांतून
जगावंसं खूप काही

मनःचक्षू जीवनातून
भटकावंसं स्वप्न काही
आयुष्याच्या प्रवाहातून
वहावंसं खूप काही

अव्यक्त अनुभूतीतून
अनुभवावा भाव काही
स्वयंसिद्ध अंतःकरणातून
जाणावंसं खूप काही

आज

आज रहायचं आहे असं
जसं उद्या जायचं नाही कुठं
तुझ्याबरोबर माझ्यासाठी

आज झोपायचं आहे असं
जसं उद्या नाही उठायचं
स्वप्नांमध्येच पाहण्यासाठी

आज क्षणाला पकडायचंय असं
समजून ते शक्य आहे तसं
पुन्हा पुन्हा तो जगण्यासाठी

आज आवरायचं आहे असं
जसं उद्या नाही परतायचं
तुझा माझा पसारा पाहण्यासाठी