समाधान

समाधान शोधत
जायचंय बघत

निर्जन जंगलात
ओसाड वाळवंटात
युद्धाच्या भोवर्‍यात
माणसाच्या हृदयात

दिलेल्या संस्कारात
घडलेल्या मनांत
चाललेल्या दिवसांत
समोर प्रत्यक्षात

गरिबीत जगणार्‍या
श्रीमंतीत वाढणार्‍या
श्रमिक म्हणवणार्‍या
सामान्य माणसांत

ह्या देशात
त्या खंडात
याच पृथ्वीवर
याच विश्वात

ह्याच्यात
त्याच्यात
प्रत्येकात
नी माझ्यात!

स्वप्नामध्ये

स्वप्नामध्ये रंगलो
तिथेच मी हरवलो
हा सर्व मूर्खपणा
कळूनही चुकलो

विचार विचार नी
विचारच करत राहिलो

जमिनीवरुन चालताना
क्षितीजाकडे पहात राहिलो
भोवताली दाट धुक्यामध्ये
ढगांना शोधत राहिलो

शोधत शोधत नी
शोधतच राहिलो

स्वप्नामध्ये रात्री मी
फुले उमलतांना बघितली
नी पहाटे पहाटे
मला गाढ झोप लागली

झोपत झोपत नी
झोपतच राहिलो

तिथला श्वास

उभ्या अंतःकरणात उमटलेल्या
मर्यादीत काळाच्या अनंत रस्त्यावर
मागे वळून बघता ‘दूर भासणार्‍या’
अंतःनेत्रात, श्वासाच्या कोपर्‍यात लुकलुकणार्‍या
निर्मळ हृदयातून स्मितहास्य करणार्‍या ‘स्मृती’

जशी दूर घेऊन जाणारी, सळसळत्या पानांची
श्वासात अडकलेली, एखादी शांत दूपार
जवळ येऊन दूर.. अज्ञातात जाणारा ‘अनामिक आवाज’
मनाला स्पर्शून नष्ट होणारा ‘अनोळखी’ आवाज

आज ह्या इथल्या ‘शून्य’ हवेत
मी घेतो आहे ‘तिथला श्वास’

निवांत संध्याकाळी

सूर्य मावळत असतो
देऊन रंग छटांचे आपल्यासाठी
डोळ्यात साठवण्यासाठी
स्वप्नात पाहण्यासाठी
जीवन सजवण्यासाठी

दूर घेऊन जाणार्‍या सायंवार्‍यात
मनही शांत-निवांत होतं
सभोवतालच्या वातावरणातून
मनोविश्वाच्या रमणीयतेत
सामावून जातं..

सूर्य निघून जातो
आपल्याला संधी देऊन विश्रांतीची
नव्या दिवसाची सुरुवात..
नव्या उत्साहाने करण्याची!

शोधत आपली दिशा

अनेक नजरात
अनेक मनात
मी वेगवेगळा किती
बदलांच्या ह्या धरतीवर
मी रुपांत नेमका किती

कुणाकुणा कशीकशी
माझी प्रतिमा भासे
स्वतःला मजला माझी
अस्पष्ट आकृती दिसे

जीवनाच्या अगम्यतेत
मी स्वतःस ओळखू कसा?
तो मीच आहे का?
जो हा दाखवतोय आरसा

जिथे उमटविला असेल
मी विचारांचा ठसा
भटकताहेत ते सर्वही आता
शोधत आपली दिशा

मधल्या किनार्‍यात

असा झोपेतून उठून
आलो मी स्वप्नात
रात्री पुन्हा झोपून
जगायचं जीवनात

मन आभासातून
सामावले श्वासात
श्वासातूनच
परतायचं मनात

आठवतेय शुद्ध
बेशुद्धित
दोघंही
मधल्या किनार्‍यात

आवाजात शांतता
शांततेत आवाज
जीवन जगतंय रहस्यात
रहस्य जगतंय जीवनात

दूरचा जल्लोश

दूरचा जल्लोश
हलक्याशा हवेत
वहात येतोय
माझ्या आत

सुदूर तार्‍यातून
मनोवार्‍यात
सामावून जातोय
हा प्रकाश

मनःचक्षूतून
क्षितीजापार
हरवत आहेत
हे विचार

लांबून ओळख
स्वतःची आज
असेन नसेन
मी मनात

या सुंदर एकांतात

या सुंदर एकांतात
तो दूर तारा लुकलुकताना
आज किती छान आहे ही हवा
जी माझ्या अस्तित्त्वाला स्पर्शून जात आहे

माझ्या मनोविश्वाच्या चराचरालाही
अशीच एक कोमल झुळूक झेलते आहे
श्वासाहून काही दूर
त्यातही एक सुंदर जाणिव
स्पंदनांनी स्पर्शीलेलं अस्तित्त्व आहे

करायचं आहे काहीतरी
कशाला? कुणाला?
नसलेल्या अर्थाला

दैवाचंही म्हणनं

जीवन आहे स्विकारणं
दैवाचंही म्हणनं
निरर्थक विचारांचं
तुंबून तडफडणं

स्वर्गात जाऊन पाताळात
श्वास इथे अडकतात
जीव वेळ खातो
अंत पहात राहतो

दूपार ही दुरावली
सायं ना सरकली
मध्यरात्र पाहिली
सकाळ नको झाली

स्वर्गात जाऊन पाताळात
श्वास इथे अडकतात
जीव वेळ खातो
अंत पहात राहतो

इथून दूरवर

सभोवतालच्या मंद प्रकाशातून
या अशा थंड हवेत
निवांत रस्त्यावरुन
एकटंच चालताना

वाटेवरील एक छोटा दगड
मारला मी पायाने
तो ठेचकाळत गेला पुढे
जमिनीशी अंतराने

माझं मनही
विरघळलं त्यात
ते मला सोडून
हरवलं कशात?

लगली ही ठेच
मनाला कशाची?
कोणत्या भावना त्यास
सोडताहेत दूर आकाशी

जोडू नकोस त्यास
असं मनास
ठेच लागली भावनांची
जरी या जीवनास

जग आहेस तसा
स्थिर दगडातून
इथून दूरवर..
सर्वांपासून

आभास उरावे

त्या क्षणाला त्या क्षणानेच जाणावे
नंतर फक्त केवळ आभास उरावे

आता आठवत नाही,
पण त्या तार्‍यांनाही मी काही मागितलं होतं
चालताना रस्त्यांनाही काही सांगितलं होतं
ते तारेही आता चालून गेले असतील
त्यांच्याकडेही त्या ईच्छा उरल्या नसतील

त्या मनाला त्या मनानेच जाणावे
नंतर फक्त केवळ आभास उरावे

आता आठवत नाही,
पण त्या रात्रींनाही मी आश्वासिलं होतं
वाट पाहत्या नेत्रांनाही सावरलं होतं
त्या रात्रींनीही आता डोळे मिटले असतील
त्यांच्याकडेही ती स्वप्ने उरली नसतील

रिमझिम

मी चाललो होतो फिरायला
त्या निमित्ताने काही आणायला
घेऊन सुंदर दिवस
आणि रस्ता हृदयातला

छानशी वाट सजलेली
हिरव्या बाजूंनी
फुलपाखरे खेळत होती
भोवताली रंगांनी

एक छोटेसे फुलपाखरू
गेले भोवताली बागडून
कदाचीत त्यावेळी माझं
मनच गेलं होतं फुलून

एकू येत होती
सळसळ पानांची
लागली होती थंड
चाहूल वार्‍याची

वार्‍याचा झोत गेला
स्पर्शून सर्वस्वाला
मी भोवताली अनुभवली
मनात हेलावत्या पानांची रिमझिम