जीवन संगीत

सुरकुतलेला चेहरा
विस्तारलेले विचार
जन्मभर सहन करुन
ऋतूंचा मार

थकलेले शरीर
परिपक्व मन
चढउतारांचे
बधून क्षण

अस्पष्ट नजर
दूरवर दृष्टी
अनुभवून ही
सारी सृष्टी

शांतता कानात
विचार मनात
ऐकत राहतो
जीवन संगीत

हसत आहे भिकारीण

हसत आहे भिकारीण
आणि तिची मुलगी लहान
स्वतःला विसरुन काही क्षण
की, आहे त्यात मानून समाधान?

रस्त्यावरील हे चित्र
मज जाणवलं विचित्र
कारण, शाळेत शिकलोय मी
दुःखी कष्टी आहेत ती

आपल्यातच इथे तिथे
जगवेल जागा त्या तिथे
मळकट कपड्यांत,
विस्कटलेल्या केसांनी
भटकतात ते अणवाणी

मन प्रत्येकाचं मागणारं
भावनांमागे धावणारं
परी प्रेमास न लागे भिक
हे मना! तू यातून शिक

हसत आहे भिकारीण
आणि तिची मुलगी लहान
स्वतःला विसरुन काही क्षण
आहे त्यात मानून समाधान!

असेलच कोणीही

असेलच कोणीही
त्याच्या विश्वातही

ईच्छांनी सजवलेलं
एक स्वप्न असेल
हृदयाच्या कोपर्‍यात
एक कोपरा असेल

मनातच मनानं लिहिलेली
अपूर्ण ओळ असेल
त्याची शाई अजूनही
काहीशी ओली असेल

असेलच कोणीही
त्याच्या विश्वातही

एकांतात जाणलेलं
एक प्रेम असेल
कुठेही नसलेलं
अस्तित्त्व असेल

हृदयानं बांधलेला
ऋणानुबंध असेल
स्पर्शून गेलेला
तो अानंद असेल

तुला बघताना

तुला तिथून बघताना
क्षण नाजूक जीवनातला
मी बघत बघत नी
बघतच राहिलो
समोर नसतानाही बघितलं

सुंदर जीवनातल्या सकाळी
तुला बोलताना, हसताना बघितलं
वेळेचीही गती हरवली
त्या माझ्या एकाग्रतेनं

माझ्या या आयुष्यातलं
काही आयुष्य चोरलं तुझं
ना करेन परत तुला
अर्पण करेन अनंताला

तू आणि मी

वाटतं एकत्र असावं
तू आणि मी
निवांत एकांतात
स्पंदनांनी ऐकावी स्पंदनं
आणि मी ऐकावं
तू न बोलताच काही

नेत्रांतील तरल पाण्यात
विरघळेल तुझ्यात
सारं विश्व माझं
श्वासांनी घ्यावा श्वास
आणि मी द्यावं
तुज आत्म्यास काही

क्षणांनी थांबवावं क्षणांना
आणि मी थांबेन
नेहमीच तुझ्यासाठी
स्पर्शाने जाणावा स्पर्श
आणि मी जाणावं
हृदयातील नवा हर्ष 

पक्षी

आत्मविश्वासाने घेतो भरारी
पडण्याची नाही भिती कधी
मुक्तपणे विश्वात भटकतो
हरवण्याची नाही भिती कधी

सुंदर सुंदर रंग निराळे
आहेत आमच्या पंखांना
ऐकमेकांच्या साथीने
फिरतो दाही दिशांना

निसर्गातील सुंदर दृश्ये
आहेत आमच्या साथीला
मिळेल ते इथूनच घेतो
शिदोरी नाही गाठीला

छान छान गीत गातो
बोलतो ऐकमेकांना
थव्याने एकत्र उडतो
सामावतो सर्वांना

अनेक ठिकाणी

एकावेळी अनेक ठिकाणी
असतो प्रत्येकजण
त्याच्याच निराळ्या रूपात
स्वार्थी स्वरूपात

फायदा फायदा
आपले स्थान
अडकलेला
आपला मान

मनासारखं हवं असतं
पण निराळं मन
आधीच घडलेलं असतं


इतर काही
असेलही खरं
पण आपलं तेच
आहे बरं

कोणी पडलं यातून बाहेर
तर मिळतो त्याला घरचाच आहेर!

आपल्या आपल्या गावी

आपल्या विश्वात, आपल्या स्वप्नात
आपल्या आपल्या गावी
त्याच दिशांना, त्याच ठिकाणी
नेहमीचीच जीवनगाणी

आपल्या परिवारात, आपल्या माणसांत
आपल्या आपल्या गावी
त्याच निवार्‍यात, त्याच आधारात
स्वतःची ओळख जपावी

आपल्या घरात, आपल्या कामात
आपल्या आपल्या गावी
त्याच सुखांत, त्याच दु:खात
प्रत्येकाची एक कहाणी

आपल्या समस्या, आपलेच उपाय
आपल्या आपल्या गावी
तीच संकटे, त्याच अडचणी
जीवन सोडविण्याच्या कामी

आपल्या जन्मात, आपल्या मॄत्यूत
आपल्या आपल्या गावी
त्याच ईच्छांत, त्याच आकांक्षात
संपते एक कहाणी

आपला स्वभाव, आपले मन
आपला चेहरा, आपली ओळख
केवळ आपल्या आपल्या गावी

साथ

सूर्य फिरला
सावली फिरली
डोक्यावरची
छाया गेली

बदलला ऋतू
उडाले पक्षी
सोबत राहतील
वाटलं होतं

भूकंप येताच
पडली घरे
खंबीर उभी
केली होती

आल्या समस्या
बदलली माणसे
साथ देतील
वाटलं होतं