खूप काही

शून्यशा अनंतातून
सांगावंसं खूप काही
मुक्याशा जीवनातून
बोलवंसं खूप काही

अज्ञेय मितीतून
गुंतावंसं मन काही
जाणवत्या भासांतून
जगावंसं खूप काही

मनःचक्षू जीवनातून
भटकावंसं स्वप्न काही
आयुष्याच्या प्रवाहातून
वहावंसं खूप काही

अव्यक्त अनुभूतीतून
अनुभवावा भाव काही
स्वयंसिद्ध अंतःकरणातून
जाणावंसं खूप काही

आज

आज रहायचं आहे असं
जसं उद्या जायचं नाही कुठं
तुझ्याबरोबर माझ्यासाठी

आज झोपायचं आहे असं
जसं उद्या नाही उठायचं
स्वप्नांमध्येच पाहण्यासाठी

आज क्षणाला पकडायचंय असं
समजून ते शक्य आहे तसं
पुन्हा पुन्हा तो जगण्यासाठी

आज आवरायचं आहे असं
जसं उद्या नाही परतायचं
तुझा माझा पसारा पाहण्यासाठी

त्या तिथे

उदास शांतता
हतबद्ध चेहरे
कुजक्या भिंती
पत्र्यांची घरे

अस्ताव्यस्त कचरा
त्याचा वास
अंधारच अंधार
मिणमिणता प्रकाश

आजारी कोणी
कोणी कामात
विषण्ण आकृत्या
दिसताहेत घरात

जीवन हुडकत
भटकणारे कुत्रे
दैवाच्या हाती
सगळी सुत्रे

मळका वेष
दारिद्र्याची रेष
इच्छा स्तब्ध
त्या तिथे

आमची छोटीशी मनी

आमची छोटीशी मनी
बसली होती दारात
साठवत बाहेरचं जग
आपल्या इवल्याशा नेत्रांत

सकाळच्या गारव्यात
कोवळ्या सोनेरी उन्हात
कसल्याशा विचारात
काय तिच्या मनात ?

इच्छा खेळण्याची
बाहेर जाण्याची
मनसोक्त जगण्याची
भावना चैतन्याची

परी यायचीये वेळ
घराबाहेर पडण्याची
कुत्र्याच्या संकटाशी
दोन हात करण्याची

खेळतीये अजूनही
स्वतःच्याच शेपटीशी
झोपावंसं वाटतं तिला
आमच्याच उश्याशी

धडपडतीये ती
शिकतीये त्यातून
सुटण्यासाठी येत्या
प्रत्येक संकटातून