चाललंय आपलं असंच..

चाललंय आपलं असंच..
आयुष्याची जुळवा-जुळव
मांडून नात्यांची समीकरणं
पै-पैशांचा हिशोब करत

वेळ किती माहीत नाही
गृहीत धरलीये तिला
येते-जाते सहज आपली
पहात राहते मला

वाट तुडवते आयुष्य आपले
हृदयात क्षणभर थांबते
मग असेच आठवून काही
मनाशीच चालत राहते

श्वास जिवलग सखा-सोबती
पण 'मोजत' नाही त्याला
परी एकांती बोलत राहतो
उगा एकट्या जीवाला

चाललंय आपलं असंच..
आयुष्याची जुळवा-जुळव
पसारा पडलाय अवती-भोवती
आपलं काहीच नाही मिळत